सांगली :मिरज शहरातील झारीबाग येथील बुधगावकर मळा येथे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यशवी देशमाने हिचे वडील हे डॉक्टर आहे. ते निर्मिती टॉवर इमारतीमधील पाचव्या मजल्यावर राहतात. देशमाने यांना दोन मुली आहेत. यापैकी मोठी मुलगी आजारी होती. त्यामुळे देशमाने दांम्पत्य तिला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. याचवेळी त्यांची लहान मुलगी ही झोपली असल्याने त्यांनी तिला घरात ठेवून जाणे पसंत केले. यावेळी घरातून बाहेर पडताना देशमाने दांम्पत्यानी घराला बाहेरुन कुलूप लावले होते.
तोल जावून खाली पडली :आपल्या मोठ्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर घरात एकटीच असणाऱ्या चार वर्षीय यशवीला काही वेळाने जाग आली. त्यानंतर ती घरात आपल्या पालकांना शोधू लागली. घरात कोणीच नसल्याने घाबरलेल्या यशवीने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरून कुलूप असल्याने तो उघडू शकला नाही, मग ती घराच्या गॅलरीमध्ये पोहचली होती. यावेळी गॅलरी मधून तिने कोणी दिसतेय का? हे पाहण्यासाठी गॅलरीतून वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा तोल गेला, ती थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
उपचार सुरू असताना यशवीचा मृत्यू :दरम्यान यशवी खाली पडल्याची बाब आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर जखमी अवस्थेत असणाऱ्या यशवीला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना यशवीचा मृत्यू झाला. यशवीच्या मृत्यूनंतर देशमाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. या घटनेची माहिती मिळताचा देशमाने यांच्या नातेवाईकांना भारती हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.