सांगली- विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी सांगली महापालिकेवर आज (गुरुवार) चक्क 'गाढव मोर्चा' काढण्यात आला. दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
दलित महासंघाने काढला सांगली पालिकेवर गाढव मोर्चा हेही वाचा -मटणाचा दर २० रुपयांनी केला कमी; ५४० रुपयेवर विक्रेते ठाम
सांगली महापालिका क्षेत्रातील म्हाडा आणि वाल्मिकी आवास घरकुल योजनेच्या ठिकाणी महापालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यात दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप दलित महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांना पालिका प्रशासनाकडून मुलभूत सुविधा देणे आवश्यक आहे, ते अद्यापपर्यंत मिळाल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांच्या मागण्या घेऊन आज दलित महासंघाच्यावतीने सांगली महापालिकेवर आंदोलन करण्यात आले.
पालिका कारभाराविरोधात चक्क गाढव मोर्चा काढत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. प्रशासनाकडून नेहमी त्याठिकाणी सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात येते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात येत नसल्याचा आरोप करत, तातडीने समस्या सोडवाव्यात अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे.