सांगली - महापालिका क्षेत्रातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी थेट महापालिकेवर "घोडे" घेऊन मोर्चा काढण्यात आला आहे. वारंवार रस्ते दुरुस्तीची मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दलित महासंघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
दलित महासंघाचा 'घोडा' मोर्चा पालिकेच्या विरोधात घोडा मोर्चा -
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातल्या रस्त्यांची दुरूस्ती व इतर विकास कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता. मात्र पालिकेकडून अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. जे रस्ते झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले व पुन्हा ते खराब झाले. त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले असून गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दलित महासंघाच्या वतीने वारंवार निवेदने व आंदोलन करण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाकडून मागण्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीने शुक्रवारी अनोख्या पद्धतीने महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
रस्ते दुरावस्थेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न -
दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेवर थेट घोडे घेऊन मोर्चा काढण्यात आला. कारण सांगली महापालिका क्षेत्रातले रस्ते आता दुचाकी असतील किंवा चार चाकी वाहन धारकांना चालवण्यासाठी राहिले नाहीत, सारे रस्ते हे खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे आता घोडे घेऊन या रस्त्यांवर चालण्या शिवाय पर्याय उरला नाही, त्यामुळे पालिकेला जाग आणण्यासाठी हे घोडे घेऊन आंदोलन करण्यात आल्याचं उत्तम मोहिते यांनी सांगितले आहे.