सांगली -असे म्हणतात वयात काय आहे?...असावी लागते फक्त जिद्द...आणि हे सिद्ध करून दाखवले आहे, सांगलीच्या मिरजेतील रिक्षाचालक असणाऱ्या एका आजोबांनी. वयाच्या पन्नाशीमध्ये सायकल चालवण्याचा छंद जडलेल्या आणि सध्या एकाहत्तरीत सुसाट सायकल चालवणाऱ्या अशोक पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
चालवतात रिक्षा, पण ओळख सायकलवाले काका..
सायकल चालवण्याचे फायदे सर्वांनाच ठाऊक आहेत. कोरोनाच्या संकटातही सायकलिंगचे फॅड सगळीकडे वाढलेले पाहायला मिळत आहे. मात्र, मिरजेतील एक आजोबा गेल्या वीस वर्षांपासून नित्यनियमाप्रमाणे सायकलिंग करत आहेत.अशोक पाटील,असे या आजोबांचे नाव आहे. व्यवसायाने रिक्षाचालक असणारे पाटील आज एक उत्तम सायकलपटू बनले आहेत. त्यामुळे 'सायकलवाले काका' म्हणून ते शहरात ओळखले जातात.
घोड्याबरोबर धावण्यामुळे मॅराथॉनच्या शर्यतीत..
सायकलवाले काका मुळात एक मॅराथॉन खेळाडू राहिले आहेत. राज्य पातळीवरील मॅराथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. या मॅराथॉनकडे वळण्यामागे एक गोष्ट असल्याचे अशोक पाटील सांगतात. घरात लहानपणापासून घोडागाडी होती आणि त्यावेळी घोड्यांच्या शर्यतीमध्ये आमचे घोडे सहभागी होत असत. शिवाय, घोड्यांचा सराव करताना आपण घोड्याबरोबर धावत असायचो, असे पाटील आजोबा आवर्जून सांगतात.
असा सुरू झाला सायकलप्रवास..
लग्नानंतर मॅराथॉन स्पर्धा जवळपास बंद केल्या. पोटा-पाण्यासाठी पान-टपरीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र एकाच ठिकाणी बसून वजन वाढत होते. यादरम्यान सायकलचा वापर सुरू केला. त्यांनतर पान-टपरीचा व्यवसाय बंद करून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. यादरम्यान सायकल चालवताना अनेक ठिकाणी सायकलपटूंच्या शर्यतीचे मोठे आकर्षण निर्माण झाले. त्यातून आपण मुलांच्या बरोबर सायकलिंग सुरू केली, असे पाटील आजोबा सांगतात.
२० वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद ..
पाटील आजोबा सांगतात, की वयाच्या पन्नाशीनंतर सायकल आणि आपले एक वेगळे नाते निर्माण झाले. मात्र नेहमीच्या सायकल चालवण्यापेक्षा
शर्यतीच्या सायकल चालवणे यामध्ये अधिक आवड निर्माण झाली. मुळातच एक खेळाडू असल्याने रेसिंग सायकल ही फार अवघड बाब माझ्यासाठी राहिली नाही आणि त्यानंतर शासकीय आणि इतर ठिकाणी झालेल्या अनेक सायकल रॅसिंग स्पर्धेमध्ये आपण सहभागी नोंदवला.