सांगली - "आली अंगावर, घेतली शिंगावर"असंच काहीसं सांगलीच्या साटपेवाडीत एका अजस्त्र मगरीबाबत घडले आहे. गावातील कृष्णाकाठी मगर आली आणि ग्रामस्थांनी तिला जेरबंद करत थेट खांद्यावरून उचलून नेऊन वन विभागाकडे सुपूर्द केल्याचा प्रकार घडला आहे. मगरीमुळे गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामस्थांनी हे धाडस केलं आहे.
मगरीला ग्रामस्थांनी घेतले थेट खांद्यावर मगरीच्या दर्शनाने गाव भेदरलं
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आली. त्यानंतर गावातील लोकांनी नदीकाठी धाव घेतली. मगरीच्या या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही मगर पुन्हा पात्रात गेली तर गावात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या भावनेने ग्रामस्थांनी मगर जेरबंद करण्याचे ठरवले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर दहा ते बारा फुटाची अजस्त्र मगर पकडण्यात ग्रामस्थांना यश मिळाले.
खांद्यावरून वाहून नेली अजस्त्र मगर
दरम्यान, मगरीबाबत वन विभागालाही कळवण्यात आले होते. रात्रीची वेळ झाल्याने पकडण्यात आलेल्या अजस्त्र मगरीला नदी काठीच जास्त काळ ठेवणे मुश्कील बनल्याने ग्रामस्थांनी मगर पुन्हा सुटून गेल्यास अवघड परिस्थिती निर्माण होईल,या भितीने वन विभागाच्या ताब्यात देण्यासाठी मग ग्रामस्थांनी अजस्त्र मगरीला थेट खांद्यावरून घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. गावातील तरुणांनी मिळून अजस्त्र मगरीला खांद्यावर घेऊन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.