सांगली - कृष्णा नदीतील मगरीने पुन्हा डोकेवर काढले आहे. आज (गुरुवारी) सांगली नजीकच्या मौजे डिग्रज येथे एका १२ वर्षीय लहान मुलाला ओढून नेल्याचा प्रकार घडला आहे. आकाश जाधव असे या चिमुरड्याचे नाव असून तो आपल्या कुटुंबा समवेत नदीकाठी विटभट्टीच्या ठिकाणी राहत होता. या घटनेनंतर वनविभाग आणि ग्रामस्थांकडून कृष्णानदी पात्रात त्या मुलाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
कृष्णाकाठी मगरीची दहशत; १२ वर्षीय मुलाला ओढून नेले नदीत, शोध सुरू - कृष्णा नदी
आकाश हा नदीकाठी बसला असता, नदीतील मगरीने नदी काठावर येऊन आकाशाला ओढून नेल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. यानंतर कुटुंबाने आक्रोश करत शोध सुरू केला.
जाधव कुटुंब हे मूळचे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील निंबळकवाडी येथील आहे. विटभट्टीवर मजुरीसाठी ते मौजेडिग्रज येथे आले होते. आज दुपारच्या सुमारास आकाश हा नदीकाठी बसला असता, नदीतील मगरीने नदी काठावर येऊन आकाशाला ओढून नेल्याचे कुटुंबाचे लक्षात आले. यानंतर कुटुंबाने आक्रोश करत शोध सुरू केला.
या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत वन विभागाला कळविले. यानंतर वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा शोध सुरू केला आहे. गेल्या ६ तासापासून नदी पात्रात ग्रामस्थ आणि वनविभागाच्या पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे.