सांगली -व्हॅट थकवल्याप्रकरणी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 12 कोटींच्या थकीतप्रकरणी 16 जणांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती, जीएसटी उपायुक्त शर्मिला मिस्कीन यांनी दिली आहे.
12 कोटींचा व्हॅट थकवला
सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडून कंट्री लिकरची निर्मिती करण्यात येते, आणि या लिकरच्या माध्यमातून जमा झालेला "व्हॅट कर" भरण्यात आलेला नाही. ऑक्टोंबर 2017 पासून डिसेंबर 2020 पर्यंत लिकर विक्रीतून व्यापाऱ्यांकडून हा कर गोळा करण्यात आला होता. तब्बल 9 कोटी 8 लाखांचा कर गोळा करण्यात आला होता, या कराचे व्याज 3 कोटी 36 लाख मिळून एकूण 12 कोटी 44 लाखांचा कर थकवण्यात आला आहे. जीएसटी विभागाकडून व्हॅटची रक्कम जमा करण्याबाबत वारंवार सूचना कारखाना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या, मात्र कर भरण्यात न आल्याने, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल पाटलांसह 16 जणांविरोधात गुन्हा दाखल
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हे काँग्रेसचे नेते विशाल पाटील आहेत, मात्र गेल्या 4 वर्षांपासून त्यांचा हा कारखाना त्यांनी दत्त इंडिया शुगर कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला आहे, मात्र ही रक्कम 2017 मधील आहे. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळांवर हा व्हॅट थकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.