सांगली - शिराळा तालुक्यातील मांगले येथील दशवंत वस्तीतील ६ गोठ्यांना लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.
गोठ्यांना लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू, १८ लाखांचे नुकसान शॉटसर्किटने लागलेल्या या आगीत राजाराम दशवंत, अण्णा दशवंत, भिकाजी दशवंत आणि संदीप दशवंत यांचे जवळपास १८ लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत १५ शेळ्या आणि अनेक कोंबड्या दगावल्या. त्याचबरोबर संसारोपयोगी साहित्य, खते, शेती अवजारे, धान्यही भस्मसात झाले.
हेही वाचा -अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी बंगळुरुत दाखल, आज न्यायालयात करणार हजर
विश्वासराव नाईक कारखान्याच्या अग्निशामन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत मनुष्यहानी झाली नाही. मांगले विभागाचे मंडल अधिकारी आर. डी. माने, गाव कामगार तलाठी एस. आर. बागडी यांनी रविवारी सकाळी या घटनेचा पंचनामा केला. या आगीत ६ लाख १८ हजार किमतीच्या दुभत्या जनावरांसह १२ लाखांचे इतर साहित्य, असे अंदाजे १८ लाखांचे नुकसान झाले आहे.