सांगली- ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू रूग्णांना शासकीय दरापेक्षा अर्ध्या दराने उपचार सेवा देण्याचे काम राष्ट्रीय न्याय संशोधन संस्थेच्या नुतन कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे करण्यात येत आहे. मुंबईच्या धर्तीवर फिवर ओपीडीही याठिकाणी सुरू करण्यात आली असून उपचारासह कोरोना केअर सेंटरही सुरू करण्यात आल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना आधार ठरणार आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. सर्वाधिक प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात आहे. अधिक प्रमाणात ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी थेट शहरात धाव घ्यावी लागते. पण, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळेल याची शाश्वती नाही. यातून ही बेड मिळाला तर सर्व सामान्य रुग्णाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची अडचण ओळखून कवठेमंकाळ स्थित असणाऱ्या राष्ट्रीय न्याय संशोधन संस्था संचलित नूतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून नरसिंहगाव याठिकाणी कोविड रुग्णालय व कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आला आहे. पन्नास बेडची क्षमता असणाऱ्या या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता आहे. त्याचबरोबर सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांच्यासाठी केअर सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर या ठिकाणी फिवर ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कोरोनाच्या पाहिल्या लाटेत काम केलेले डॉ. ऋतूज माळी आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांमार्फत उपचार होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रूग्णालयात शासकीय दरापेक्षा निम्म्या दराने पैसे आकारून उपचार केले जाणार आहेत. ज्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सामजिक संस्थेकडून गरजू रुग्णांना मदतीचा हात
राष्ट्रीय न्याय संशोधन संस्थेचे सचिव डॉ. रामलिंग माळी म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि कायदा या क्षेत्रात काम करते. तर या संस्थेच्या माध्यमातून नुतन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चालवली जाते. त्याचे चार सेंटर्स राज्यात असून याचे मुख्य कार्यालय कवठेमहांकाळ या ठिकाणी आहे. आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या संस्थेच्या नर्सिंग स्टाफच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना अल्पदरात उपचार कसे देता येतील, या उद्देशाने कोविड हेल्थ व केअर सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. मुळात होमियोपॅथिक महाविद्यालय असल्याने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा फायदा ग्रामीण भागातल्या गरजू रुग्णांना व्हावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून कोरोना सेंटर सुरू करण्यात आला आहे.
शासकीय दरापेक्षा निम्मा दर