सांगली- कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या वाळवा तालुक्यातील कुरळप गावात गेल्या काही दिवसांपूर्वी एक रुग्ण सापडला. त्यानंतर गावात तब्बल १९ कोरोनाबाधित सापडले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस अतोनात मेहनत घेत होते. लोकांमध्ये जनजागृती करणे, तसेच त्यांना नियमांचे पालन करायला लावणे, यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद काटे गावोगावी फिरत होते. मात्र, अनलॉक सुरू झाल्यापासून गावात रस्त्यांवर आणि चौकात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे आणि रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गावात लॉकडाऊनची नितांत गरज असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सांगलीच्या कुरळप गावात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; लॉकडाऊनची मागणी - सांगली कोरोना अपडेट
सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गावात आतापर्यंत १९ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने गावात लॉकडाऊन लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गावाचे दर दोन दिवसांनी निर्जंतुकीकरण करणे, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, तसेच बाहेरून सामान विक्रीसाठी गावात येणाऱ्यांवर बंदी घालणे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव काही दिवसांसाठी बंद करा, अशा मागण्या स्थानिक करत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिक सुरक्षित अंतर पाळणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे यासारख्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. रक्तदाब, मधुमेह किंवा इतर आजार असणाऱ्या नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये, लहान मुलांना घराबाहेर न पडू देणे, तसेच बाहेरून आलेल्या लोकांच्या संपर्कात न येणे आणि बाहेरून आलेल्यांनी अलगीकरणात राहावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.