सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी कोरोना संदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना म्हणजे थोतांड असून हे थोतांड सरकार का वाढवत आहे, असा प्रश्न भिडे गुरुजींनी विचारला आहे. तसेच पंढरपूरच्या वारीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. वारीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला वारकर्यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवे होते, असेही ते म्हणाले.
'कोरोना तर षडयंत्र आहे' -
देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली, कारण वारीमुळे कोरोना वाढू शकतो. मात्र, कोरोना म्हणजे केवळ थोतांड आहे आणि हे सरकार हा थोतांड का वाढवत आहे, अशी प्रतिक्रिया भिडे गुरुजींनी दिली. कोरोनामुळे आज देशवासियांच्या मनात फक्त भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीवर जर बंदी घातली नसती, तर देशात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसता. कोरोना हे षड्यंत्र आहे, हे देशाचे दुर्देव आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - पंकजा मुंडे उद्या घेणार नाराज समर्थकांची भेट