सांगली- चिकुर्डे येथील सुरेश शंकर पाटील आणि विजयकुमार शंकर पाटील या दोन भावांनी दीड लाख खर्चून दोन एकर क्षेत्रामध्ये भोपळा पिकाची लागण केली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहतूक आणि मार्केट बंद असल्याने भोपळा पीक हे जाग्यावरच कुजले. त्यामुळे, त्यांना उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला. यात शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
चिकुर्डे येथील पाटील बंधूनी आपल्या 955अ गटातील दोन एकर क्षेत्रात 1076 सेंच्युरियन या जातीच्या भोपळा पिकाची 13 जानेवारीला लागण केली होती. हे पीक 70 दिवसाचे असल्याने 25मार्चला याची तोडणी होणार होती. उन्हाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन कमी निघते यामुळे मार्च एप्रिल महिन्यामध्ये भाजीपाल्यांना चांगला दर मिळत असतो. यामुळे, पाटील बंधूनी अगोदर शेतात असणारे पीक काढून 13 जानेवारीलाच लागण केली. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन तर दीड लाख रुपये खर्च करून खत आणि औषधांची फवारणी करण्यात आली होती. यामुळे कमीत कमी 50टनाचे उत्पादन निघाले असते.