सांगली - महापालिका क्षेत्रातल्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय कोरोना सेंटर सुरू करण्याबाबत महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,असा विश्वास महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन नगरसेवकांनाही सूचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका आणि नमराह फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
पालिकेच्या मदतीला सामजिक संस्था..सांगली महापालिका क्षेत्रातील वाढत्या करून रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे कोरोना सेंटर उभे राहत आहेत. नमराह फाऊंडेशन आणि सांगली महापालिकेच्या माध्यमातून शहरातील शिंदेमळा येथील लवली सर्कलजवळील महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 45 मध्ये दहा ऑक्सिजन बेड असलेले सेंटर उभारण्यात आले आहे. या कोरोना सेंटरचे लोकार्पण सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे महापालिका गटनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील,माजी महापौर मैनुद्दीन बागवान,नगरसेविका रोहिणी पाटील,नगरसेविका मदीना बारूदवाले, सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पेंढारी व नमराह फाऊंडेशनचे जावेद नायकवडी, रहिम मुल्ला, मुन्ना पटेकरी, डाँ.अब्दुलरोफ,इरशाद मुल्ला ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग निहाय कोरोना सेंटर उभारण्याचा मानस..महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले,आज महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे,बेडस अपुरे पडत आहेत.तर गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाची बिले भरण्यासाठी पैसे नाहीत. पालिकेच्यावतीने जम्बो कोविड सेंटर सुरू आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्यामुळे तेही अपुरे पडत आहे. या स्थितीत नमराह फाउंडेशनच्या पुढाकाराने उभारलेले कोविड सेंटर आधार देणारे ठरत आहे. कोविड सेंटर सुरू होणे ही गरजेचे असून महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात नगरसेवक आणि सामजिक संस्थांच्या सहभागातून कोरोना सेंटर चालू करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित करून,त्याबाबत नगरसेवकांना सूचना देऊन सर्व सहकार्य देण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल,असा विश्वास महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.