सांगली -गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले सांगली महापालिकेचे कोरोना केअर हॉस्पिटल आज पासून बंद करण्यात आले आहे. पालिकेने उभारलेल्या राज्यातील या पहिल्या कोरोना सेंटर मधून दीड महिन्यात 648 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, सध्या रुग्णांच्या अभावी हे हॉस्पिटल बंद करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. तर दुसर्या बाजूला सांगली जिल्ह्यातील अनेक कोरोना रुग्णालयात शून्य रुग्ण संख्या झाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेला कोरोनाचा कहर गेल्या काही दिवसांपासून थांबला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाली आहे. परिणामी अनेक कोरोना रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. सांगली महापालिकेच्या डेडीकेटेड कोरोना रुग्णालयात काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटल्याने पालिकेच्यावतीने बुधवारपासून कोरोना हॉस्पिटल बंद करण्यात आल्याचे पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी जाहीर केले आहे.
अवघ्या 12 दिवसांमध्ये राज्यातलं पहिलं महापालिकेचा कोविड रुग्णालय सांगली महापालिकेच्या वतीने कोल्हापूर रोडवरील आचार्य आदीसागर कार्यालयामध्ये उभारण्यात आले होते. 120 ऑक्सिजन बेड याठिकाणी पालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आले होते. 21 ऑगस्टपासून हे रुग्णालय सुरू झाले होते आणि या ठिकाणी तज्ञ डॉक्टर, आर टी पीसीआर तसेच अँटीजेन टेस्ट अशी अद्ययावत यंत्रणा सुद्धा उभारण्यात आली होती. 56 दिवसांमध्ये या ठिकाणी जवळपास 648 कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना बरही करण्यात आलं होते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचा सांगली महापालिका क्षेत्रातल्या कोरोना रुग्णांची संख्या घटत चाललेली आहे, त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण ही घटले आहे. परिणामी पालिकेच्या वतीने आता हे कोरोना हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारपासून हे रुग्णालय बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.