सांगली - जिल्ह्यातील बोरगावमध्ये गेल्या 82 वर्षांपासून एका मंदिरात अखंडपणे वीणा वादन सुरू आहे. अख्खं गाव रात्रंदिवस विठ्ठलाच्या गजरात वीणा वादन करण्यात मग्न असते. आजपर्यंत एकदाही विठ्ठलाच्या सेवेत असणारी वीणा जमिनीवर ठेवली गेली नाही. मोठ्या श्रद्धेने ही वीणा वादनाची परंपरा जोपासण्यात येत आहे. पाहूया वीणेतून गुंफलेला या गावाचा एकोपा...
तब्बल 82 वर्षांपासून सुरूय अखंड वीणा वादन, अख्खे गाव जोपासतय विणेची परंपरा गाव म्हटले की, मंदिरात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आराधना करतो. मात्र, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावमध्ये अख्खे गाव दिवस-रात्र वीणेच्या माध्यमातून विठ्ठलाची आराधना करत आहे. विशेष म्हणजे गेल्या 82 वर्षांपासून बोरगावमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात 24 तास वीणा वादन सुरू आहे. आजपर्यंत अखंडपणे विठ्ठल मंदिरात वीणा वादनाची परंपरा गावकऱ्यांकडून जोपासली जात आहे. गेल्या 82 वर्षात एकदाही या मंदिरात असणारी वीणा जमिनीवर ठेवली गेली नाही. एका पहारेकराच्या गळ्यातून थेट दुसऱ्या पहारेकरच्या गळ्यात देऊन वीणा वादनाची परंपरा जोपसण्यात येत आहे.
हे वाचलं का? - राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण; मात्र, जागेअभावी दुर्मिळ वस्तू नागरिकांच्या दृष्टीआड
बोरगावमध्ये बहुसंख्य लोक हे माळकरी आहेत. त्यामुळे येथे वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. या गावातील महादेव बुवा बोरगावकर यांनी 19 डिसेंबर 1937 मध्ये या अखंड वीणा वादनाची परंपरा सुरू केली. सुरुवातीला लहान असणाऱ्या या गावातील 24 कुटुंबांवर वीणेची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक कुटुंबातील लहान-थोराने 24 तासांचा वेळ विभागून घेतला. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे. आज 4 हजाराच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या गावातील जवळपास 90 टक्के गावावर म्हणजेच 127 कुटुंबांवर असणारी वीणा वादनाची जबाबदारी मोठया भक्तिभावाने सर्वजण जोपासत आहेत.
एकादशी असेल किंवा कोणतीही दिंडी यामध्ये संपूर्ण गाव आवर्जून सहभागी होते. आज या परंपरेमुळे बोरगाव पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जाते. या वीणेच्या परंपरेमुळे गावात फारसे तंटे ही होत नाही. त्यामुळे आज संपूर्ण बोरगाव एका वीणेच्या माध्यमातून विठ्ठलाच्या भक्तीबरोबर एकोप्यात नांदत आहे.