सांगली - सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवारा बांधकाम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून बांधकाम कामगारांचे घरकुलासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र शासनाकडून या मागण्यांबाबत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत, संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
प्रलंबित मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचे आंदोलन
सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवारा बांधकाम संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून बांधकाम कामगारांचे घरकुलासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र शासनाकडून या मागण्यांबाबत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत, संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
दोन वर्षांपासून कामगारांचे प्रश्न प्रलंबित
सांगली जिल्ह्यामधील दहा हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानाचे अर्ज, कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज, ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या विधवा पत्नीला मंडळाकडून मिळणारे लाभ अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी बांधकाम कामगारांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करावेत, जिल्ह्यात ऑनलाईन प्रक्रिया कार्यरत नसल्यामुळे, पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन अर्ज घेणे सुरू करावे. यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.