सांगली -सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. मात्र सकाळपासून जिल्ह्यात आणि वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाने उघडीप दिला आहे. तर कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सांगलीत वाढणारी पाण्याची पातळी 52 फूटांवर जाऊन स्थिर होऊन सायंकाळी नंतर ओसरू लागेल, असे पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कृष्णा आणि वारणेला महापूर
संततधार पाऊस आणि चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. यामुळे वारणा व कृष्णा काठच्या 100 हून अधिक गावात पुराचे पाणी शिरले आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक कुटुंबाचे आणि 25 हजारांहून अधिक जनावरांचे स्थलांतर झाले आहे. ज्या गावांना पुराचा वेढा पडला आहे, त्या ठिकाणी एनडीआरएफ आणि प्रशासनाच्या वतीने बचावकार्य करत नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 3 एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत. त्याचबरोबर सैन्य दलालाही पाचारण करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सांगली शहराच्या बाजारपेठ आणि पूर पट्ट्यातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक दुकानं आणि घरं ही पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणच्या नागरिकांनी या आधीच स्थलांतर केलं आहे.