सांगली - उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांना करण्यात आलेल्या स्थानबद्ध कारवाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
प्रियांका गांधीना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगलीत संतप्त पडसाद - सांगली
उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना करण्यात आलेल्या स्थानबद्ध कारवाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे घडलेल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी मिर्जापूर नजीकच्या नारायणपूर येथे प्रियांका गांधींसह त्यांच्या सहा कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याचा प्रकार घडला. उत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाई विरोधात देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सांगलीमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपचा निषेध नोंदवला. 'सरकार हमसे डरती है, पुलीसको आगे करती है' अशा घोषणा देत आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी रस्ता रोको करत भाजपा सरकारचा निषेध नोंदविला आहे.
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि युवक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष,नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेश सरकार हे गुंडांचे पाठराखण करणारे सरकार असून पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी माणुसकीच्या भावनेतून जात असताना ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ती लोकशाहीचा गळा घोटणारी असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे. तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.