रामदास आठवले काँग्रेसबरोबर येणार; आठवलेंच्या उपस्थितीत नाना पटोलेंचे संकेत - नाना पटोले रामदास आठवले सांगली
सांगलीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने नाना पटोले आणि रामदास आठवले हे एकत्र आले होते, त्यावेळी पटोले यांनी भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात ही जोडी दिशा देण्याचे काम करेल, असे जाहीर केले आहे.
सांगली
सांगली- रामदास आठवले हे भविष्यात काँग्रेस बरोबर येतील, असे जाहीर संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिले. सांगलीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने नाना पटोले आणि रामदास आठवले हे एकत्र आले होते, त्यावेळी पटोले यांनी भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात ही जोडी दिशा देण्याचे काम करेल, असे जाहीर केले आहे.
सांगलीमध्ये राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने आदर्श राजमाता पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. या समारंभाच्या निमित्ताने रामदास आठवले यांनी पटोले यांचे तोंडभरून कौतुक केले. पटोले हे डॅशिंग आहेत, प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते जोमाने कामाला लागले आहेत. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, आम्ही आमचा पक्ष वाढवू पण त्याच्यापेक्षा अधिक जोमाने वाढवू अशा शब्दात आठवले यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या.
आठवले काँग्रेस सोबत दिसतील..!
मंत्री रामदास आठवले यांच्या कौतुकाच्या वक्तव्याचा धागा धरून पटोले यांनी व्यासपीठावरून थेट रामदास आठवले आपल्यासोबत येणार असल्याचे जाहीर संकेत दिले. पटोले म्हणाले, रामदास आठवले यांनी आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यावर जोरात कामाला लागलो आहोत आणि तेही जोरात कामाला लागले आहेत, असे सांगितले. त्यामुळे भविष्यात आमची जोडी झाली समजा आणि होण्याचे संकेत पण आहेत आणि याला नाकारता येत नाही, राजकारणात काहीही होऊ शकतो, कारण रामदासजी भाजपत जातील आणि त्यांच्या सोबत काम करतील हे कोणाला पटत नव्हते, मी पण तिकडे जाईन, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते आणि या निमित्ताने विठ्ठलाने आम्हा दोघांची जोडी एकाच व्यासपीठावर आणली असेल, तर महाराष्ट्रातील भविष्यामध्ये या पद्धतीची दिशा ठरू शकते, असे जाहीर वक्तव्य करत भविष्यात रामदास आठवले हे काँग्रेससोबत असतील, असे जाहीर संकेत रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये दिल्याने खळबळ उडाली आहे.