सांगली -शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर आज ( 3 जुलै ) सुनावणी होऊ शकली नाही. गुरुवारी ( 4 जुलै ) पुन्हा त्याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावरती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायदेवतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या घटनेप्रमाणे न्याय देणे अपेक्षित आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत देशात पक्षपातीपणा आणि एकपक्ष हुकूमशाही सुरू असल्याची टीका चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली ( Prithiviraj Chavan on Supreme Court ) आहे.
'गुंतागुंतीचा मामला' -पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात काहीतरी निकाल होईल हे अपेक्षित होतं. पण, ते पुढे ढकलले. आता फार लांबलचक आणि गुंतागुंतीचा हा सगळा मामला आहे. आम्हाला आश्चर्य वाटतंय सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बेंचच्या दोन न्यायाधीशांनी जो निर्णय दिला, तो आश्चर्यकारक होता. खरंतर आमदारांच्या निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांची शपथ देणे हे चुकीच होते. त्यानंतर अध्यक्षांची निवड ही देखील होऊन गेलेली आहे.