सांगली - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही कोणी पुढे येत नाही. अगदी सख्खे नातेवाईकही आपल्या रुग्णाकडे पाठ फिरवत असल्याचा घटना समोर येत आहेत. मात्र, सांगली महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेला स्वतःला अग्नी दिली.
मिरजेत कोरोना रुग्णांच्या चितेला अग्नी देणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून हे स्वच्छता निरीक्षक मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचे काम करत होते. त्यांनी व त्यांच्या टीमने आतापर्यंत 300 हून अधिक कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले. हे काम करत असताना या स्वच्छता निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आणि दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.