सांगली -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाला बसला आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. आज (2 ऑगस्ट) मुख्यमंत्री सांगलीतील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
अद्याप राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सांगली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
हेही वाचा -Tokyo Olympics : चक दे इंडिया! ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत
स्थानिक नागरिकांसोबत करणार चर्चा -
कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच, येथील स्थानिकांशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
मुख्यमंत्री सकाळी 9.50 वाजता मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे येणार आहेत. त्यानंतर ते भिलवडी येथेील पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करणार आहेत. तसेच ते येथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, सांगलीतील आयर्विन पूल या भागाचीसुद्धा पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. पाहणीनंतर मुख्यमंत्री हे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.
हेही वाचा -..अन्यथा 15 ऑगस्टपासून MPSC च्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन - सदाभाऊ खोत