सांगली - मंदिरात चप्पल घालून आल्याने आटपाडी मधील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह मुंबईतील एका आयकर सहाय्यक आयुक्ताचाही समावेश आहे.
मंदिरात चप्पल घातल्याच्या वादातून झाला तुफान राडा
मासाळवाडी गावामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास गावातील मंदिरात दिवाळीच्या निमित्ताने कार्यक्रम होता. यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी आले होते. यावेळी त्यांच्या पैकी काही जण हे मंदिरात चप्पल घालून आल्याने मंदिराच्या पुजाराने चप्पल बाहेर काढण्यास सांगितले. या वरुन वाद झाला. याचा राग मनात धरुन पडळकर यांनी आपल्या समर्थकांसह गावात हल्ला चढवून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात शांताबाई मासाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पडळकर आणि मासाळ गटात तुफान राडा
दोन दिवसांपूर्वी रात्री झालेल्या वादाच्या रागातून गावात पडळकर आणि मासाळ गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटाकडून दगड आणि काठ्यांनी मारामारी झाली. यात दोन चार चाकी गाड्यांची तोडफोड ही करण्यात आली आहे.
आमदार गोपीचंद यांच्या भावाचा समावेश
मासाळ यांच्या फिर्यादीनुसार वरून आटपाडी पोलीस ठाण्यांमध्ये आमदार भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.