सांगली -लॉकडाऊनचे कडक निर्बंध बुधवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर नागरिकांचा वावर रोखण्यासाठी मिरज शहरांमध्ये पोलिसांनी शहर बंदिस्त केले आहे. मुख्य रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर पोलिसांच्याकडून बॅरिकेट लावून आवश्यक असलेल्या व्यक्तींना शहरात प्रवेश देण्यात येत आहे.
शहरातील रस्ते बॅरिकेटने सील -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कडक लॉकडाऊन बुधवार रात्रीपासून जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मिरज पोलिसांनी शहरातील चौका-चौकात बॅरिकेट लावले आहेत. कडक निर्बंध असताना देखील अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे पोलिसांनी शहर बंदिस्त करून टाकले आहे. शहराच्या भोवती असणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहेत. जे प्रमुख रस्ते आहेत, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्याठिकाणी केवळ अत्यावश्यक कारण असल्यास प्रवेश देण्यात येत आहे.
तपासणी करून प्रवेश -
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठत जाणाऱ्या रस्त्यावरही सांगली शहर पोलिसांकडून बॅरिकेट लावण्यात आले आहेत. याठिकाणी तपासणी करून शहारत प्रवेश देण्यात येत आहे, विनाकारण फिरताना आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे.