सांगली- शहरात सुरू असलेल्या पूरग्रस्त सानुग्रह अनुदान वाटपावरून गोंधळ उडाला आहे. सानुग्रहाचे निकष बदलण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी शहरातील सानुग्रह अनुदान वाटप बंद पाडले आहे. रविवारपर्यंत अपार्टमेंटमधील नागरिकांनाही 5 हजार रुपयांचे देण्यात येणारे सानुग्रह अनुदान सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्येक पूरग्रस्त आणि पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सांगली शहरात प्रत्येक पूरग्रस्त व बाधित कुटुंबाला 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान रोख स्वरूपात देण्याचे काम सुरू आहे. 4 दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यात जवळपास 9 कोटीहून अधिक अनुदान वाटप करण्यात आले आहे. यामध्ये शहरातल्या ज्या ठिकाण पाणी होते आणि जो अपार्टमेंट पुराच्या विळख्यात होता, त्यामधील सर्व कुटुंबांना 5 हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात आले आहेत. मात्र, सोमवारपासून सरकारकडून अध्यादेश आल्याचे कारण देत, जिल्हा प्रशासनाने अपार्टमेंटमधील ज्या घरांमध्ये पाणी गेले होते, त्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान न देण्याची भूमिका घेतली.