सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जाहीर सभेत आभार मानले. आमचे काम राहुल गांधी करत आहेत, आणि राहुल गांधी यांची जिथे सभा होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीच्या कामेरी येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची सभा सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, भाजप उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दोन्ही पक्षाची अवस्था काही खरं नाही, राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन सभेत बोलताना 70 वर्षे तुमच्यावर अन्याय झाले, असे सांगत आहेत. मात्र, ते विसरले 65 वर्षे त्यांची सत्ता होती, पण चांगलेच आहे. राहुल गांधी आमचे काम करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा मी आभारी आहे.
राहुल गांधी यांची जिथे सभा होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो, असे प्रतिपादन करत शरद पवार यांच्या पक्षात आता कोणचं राहिले नसल्याची टीका केली. काँग्रेस आघाडीने 15 वर्षात काय केले याचा लेखाजोखा मांडावा, आम्ही 5 वर्षाचा हिशोब मांडतो असे आवाहन करत, 5 वर्षांत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले, राज्यात आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या काळात 20 हजार कोटी खर्च केले, आणि युती सरकारने 50 हजार कोटी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस आघाडीला तुम्ही मते दिली, डझन भर मंत्री दिले, मात्र, ते काही करु शकले नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जो महापूर आला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले, त्यामुळे याभागात पुन्हा पूर येऊ नये यासाठी आपण उपयोजना करण्यासाठी, पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे देण्याचा निर्णय घेतला, यासाठी 22 लोकांचा समावेश असणाऱ्या जागतिक बँकेला याठिकाणी पाठवले. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहितीआहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.