महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णा आणि वारणाकाठ उद्धवस्त करणाऱ्या प्रलयंकारी महापुराला वर्ष पूर्ण.. - सांगली महापूर

आजपासून एकवर्षापूर्वी कृष्णानदीने आपले रौद्ररुप दाखवायला सुरूवात केली आणि नदीकाठावरील हजारो कुटुंबे उध्वस्त झाली. आजही या महापूराची आठवण आली तर लोकांचे डोळे पाणावतात, मनात आठवणींची गर्दी होती. अशावेळी मदतीला धावून आलेली माणसे, पुरात घुसून लोकांची मदत करणारे, पुरग्रस्तांसाठी जेवण बनवून खाऊ घालणारे आणि पूर ओसरल्यानंतरही लोकांची जगणे सहज व्हावे यासाठी माणसेच राबत होती. या महापूराचा आढावा घेतलाय आमच्या सांगलीच्या प्रतिनिधीने...

catastrophic floods
प्रलयंकारी महापुराला वर्ष पूर्ण..

By

Published : Aug 4, 2020, 12:28 PM IST

सांगली- सांगली जिल्ह्यात आलेल्या प्रलयंकारी महापुराला ४ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. कृष्णा आणि वारणा काठ उद्धवस्थ करणाऱ्या या महापुरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, हजारो जणांचे संसार वाहून गेले तर लाखो कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. याच महापुरात माणुसकीचेही दर्शन घडले आणि या महापुराला बघता-बघता वर्ष झाले आहे. मात्र आजही महापुराच्या आठवणी सांगलीकरांच्या मनात घट्ट करुन आहेत. या महापूराचा आढावा ईटीव्ही भारतच्या "पाऊलखुणा महापुराच्या" या विशेष सदरात घेऊन येत आहे..

सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा या दोन नद्या. कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यतील आणि वारणा नदीचा उगम हा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आणि या दोन्ही नद्यांच्या काठावर निम्मा सांगली जिल्हा वसला आहे. त्यामुळे या नद्यांच्यामुळे सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग सधन बनला. संथ वाहणारी कृष्णामाई म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कृष्णा परिचित आहे. पण या नद्यांच्या रौद्र रूपामुळे वारणा आणि कृष्णाकाठ भकास सुद्धा झाला आहे. २००५ मध्ये पहिल्यांदा याचि अनुभूती जिल्ह्याला आली होती. ५५.४ फूट इतकी पाण्याची पातळी सांगलीमध्ये कृष्णा नदीने गाठले होते. शहरातील बराच भाग यावेळी पाण्याखाली गेला होता. तर नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला होता. २००५ मधील पुराचा मोठा फटका जिल्ह्याला बसला होता..आणि २०१९ मध्ये ऑगस्ट महिन्यात महापुराचा आणखी एक मोठा फटका कृष्णा आणि वारणा काठेला पुन्हा एकदा बसला..मात्र तो 'ना भूतो,ना भविष्य' असा ठरला आहे..कारण या महापुराने मागील पुराचे सर्व रेकॉर्ड तोडले होते.

अशा या महापुराच्या आठवणीने प्रत्येक सांगलीकरांच्या मनात आज ही घर करून आहे. पाहूया काय घडलं होतं, नेमकं त्या दिवशी...

काय घडलं "त्या" दिवशी ..

२७ ते २८ जुलै- ६.९ फुटांवर असणारया कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत अचानक पणे एका रात्रीत १५ फुटाने वाढली आणि कृष्णेची पाण्याची पातळी सांगलीमध्ये २१ फुटांवर पोहचली होती. ही वाढ पात्रात होती आणि पावसाळयात इतके पाणी असतेच, त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी या निसर्गाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.

२९ जुलै - कृष्णेची पाणी पातळी घटली.२ १ फूट असणारी पाण्याची पातळी ५ फुटांनी कमी होऊन १६ फुटांवर आली होती.

३० जुलै - सांगली जिल्हासह सातारा जिल्ह्यात धुंवाधार पावसाला सुरवात झाली होती. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ सुरु झाली आणि कृष्णेची पाणी पातळी २९ फूट झाली. दुसरीकडे वारणा नदी दुथडी भरून वाहत होती.

३१ जुलै ते २ ऑगस्ट - या दरम्यान पाण्याच्या पातळीत चढ-उतार राहिला. ३१ रोजी कृष्णेच्या पाण्याची पातळी ३५ फूट होतीआणि २ ऑगस्ट रोजी १ फुटाने कमी होऊन ३४ फूट झाली.

३ ऑगस्ट- संततधार पाऊस यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली होती. या दिवशी सायंकाळी ती ३६.५ फुटांवर पोहचली आणि हळूहळू शहरातील सखल भाग असणाऱ्या दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट याभागात पाणी शिरू लागले.

वारणा नदीला पूर- शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सहाव्या दिवशीही अतिवृष्टी कायम होती. या दिवशी अतिवृष्टी होऊन १४९ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली होती. त्यामुळे वारणा नदीला पूर आला आणि शिराळा तालुक्यातील वारणा नदीतील छोटे-बंधारे, काखे-मांगले पूल पाण्या खाली गेला आणि शिराळकरांचा कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा जवळचा संर्पक तुटला.

४ ऑगस्ट- या दिवशी कृष्णेने इशारा पातळी ओलांडली. सायंकाळी कृष्णेची पाणी ४१ फुटांवर पोहचली आणि कर्नाळ रोडवरील पूल पाण्याखाली गेला, तर सखल भाग असणाऱ्या दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट, काकानगर , मगरमच्छ कॉलनी ,येथील घरात पाणी शिरले. तर संततधार पाऊस आणि हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा यामुळे जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना 5 ऑगस्ट,रोजी प्रशासनाने सुट्टी जाहीर केली.

५ ऑगस्ट- या दिवशी कृष्णेने धोक्याची पातळी ओलांडली तर वारणा नदीला महापूर आला. कृष्णेची सकाळी ४४.५ फूट इतकी असणारी पाण्याची पातळी सायंकाळी ४७ फुटांवर पोहचली होती आणि ४५ फूटांची धोका पातळी कृष्णेने पार केली होती. त्यामुळे सांगली शहरा नजीकचा इस्लामपूर -पुणे बायपास रोड ,हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथील पाण्याखाली गेले.

चांदोलीत पाऊसाचा विक्रम आणि वारणा नदीला महापूर

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात असणारी अतिवृष्टी कायम होती आणि त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला होता.तब्बल ४३० मिलीमीटर इतका पाऊस २४ तासात पडला,त्यामुळे चांदोली धरणातुन सोडण्यात येणारे पाणी व संततधार पाऊस यामुळे वारणा नदीला महापूर आला. आणि पुराचे पाणी वारणा काठच्या अनेक गावात शिरले.आणि दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे वारणा आणि कृष्णा नदी काठाच्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडून १०७ गावांचा संपर्क तुटला.

६ ऑगस्ट- कृष्णेने घेतले रौद्र रूप या दिवशी कृष्णा नदीची पाणी पातळी ५१.०६ फूट झाली.कोयना धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाडणारा धुवांधार पाऊस यामुळे कृष्णा नदीला महापुरा आला.तर कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आल्याने सांगली शहरा बरोबर नदीकाठच्या १०० हुन अधिक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला. जनजीवन विस्कळीत झाले.जवळपास ५ हजार कुटुंबातील ३१ हजारहून अधिक नागरिक आणि ४ हजार जनावरांना स्थलांतर करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) टीम अखेर जिल्ह्यात दाखल झाली, शिरगाव ,कसबे डिग्रज येथे NDRF टीम कडून सुमारे 100 हुन अधिक नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली.

सांगली शहर जलमय..

यादिवशी,सांगली शहर आणि उपनगरांमध्ये महापुराचे पाणी शिरले , त्यामुळे सांगली शहर जलमय बनले . शहरातील टिळक चौक,मारुती चौक शिवाजी मंडळ परिसर,गावभाग पोलीस चौकी रोड,मथुबाई गरवारे महाविद्यालय, कोल्हापूर रोड,पाटणे प्लॉट,भारत नगर, शामराव नगर, मल्टीप्लेक्स, आयुक्त बंगला ,गवळी गल्ली,जामवाडी,जुना बुधगाव रोड, कर्नाळ रोड,राजवाडा चौक,स्टेशन चौक परिसराला पाण्याचा वेढा पडला.

कर्नाटक ,कोल्हापूर आणि इस्लामपूर रस्ते पुराच्या विळख्यात

अनेक गावांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आणि जवळचा संपर्क तुटला परिणामी वाहतूक बंद. सांगली शहरातून कोल्हापूरकडे जाणारा मार्ग पुराच्या पाणी खाली गेल्याने बंद झाला , तर पुणे - इस्लामपूर कडे जाणारा आयर्विन पूल आणि बायपास या दोन्ही ठिकाणी पुराचे पाणी. दुसऱ्या बाजूला मिरज तालुक्यातील म्हैसाळ - कागवाड रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने कर्नाटककडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तर मिरज -शिरोळ मार्गवरही कृष्णाघाट नजीकच्या अर्जुनवाड हद्दीतील रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने रस्ता बंद झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला.

एसटी सेवाही बंद..

रस्ते,पूल पाण्याखाली गेल्याने एसटी विभागाने ठराविक मार्ग वगळता पूर भागातील तसेच सांगली,मिरज शहरातील वाहतूक सेवा बंद केली. याठिकाणच्या सुमारे 600 फेऱ्यारद्द केल्या. सांगली - कोल्हापूर, सांगली -पुणे, सांगली -इस्लामपूर या प्रमुख मार्गांसह शहराच्या असापास असणाऱ्या ग्रामीण भागातील एसटी सेवा रद्द करण्यात आली.

रेल्वे सेवाही विस्कळीत

अंकली येथील कृष्णा नदीवरील रेल्वे पुलाच्या मार्गावर पुराचे पाणी ,त्यामुळे मिरज कोल्हापूर रेल्वेसेवा पुराच्या पाण्यामुळे बंद झाली. कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे मिरज स्थानकात थांबवण्यात आल्या. ७ ऑगस्ट - सांगली शहरातील पाणी पातळी पोहचली ५५.४ फूट. ज्यामुळे सांगली महापालिका कार्यालय , संपूर्ण एसटी स्टॅन्ड, झुलेलाल चौक , फौजदार गल्ली, वखार भाग, मीरा हौसिंग सोसायटी, शामराव नगरभाग , कोल्हापूर रोड ,आकाशवाणी केंद्र परिसर पाण्याखाली गेला.तर नदी काठची गाव पूर्ण पाण्याखाली गेली होती.

८ ऑगस्ट - महापुरातील काळा दिवस..

यादिवशी पाण्याची पातळी ही ५७.०५ फूट इतकी झाली होती.सांगली शहरातील कापड पेठ ,बाजार पेठ ,हरभट रोडवरील सर्व दुकाने पाण्यात बुडाली तर स्टेशन रोड, खणभाग,हिराबाग चौक ,शंभर फुटी परिसर, कॉलेज कॉर्नर, जिल्हाधिकारी बंगला इथंपर्यंत महापुराचा विळखा पडला होता. ग्रामीण भागातील अनेक छोट्या उपनद्या आणि नाले, ओढे यांनाही पूर स्थिती निर्माण झाली होत.

...आणि...ब्रम्हनाळ गावावर कोसळला डोंगर

कृष्णेच्या महापुरामुळे ब्रम्हणाळ गावाला पुराचा वेढा पडला होता .या दरम्यान बचाव कार्य करताना गावातील बोट उलटली आणि त्यामध्ये १७ जणांना जलसमाधी मिळाली.२ महिन्याच्या लहान बाळासह महिला, वयोवृद्ध आणि तरुणांचा समावेश होता. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला होता. ९ ऑगस्ट - या दिवशी पाण्याची पातळी ५७.६ इतकी पोहचली. या पाणी पातळीमुळे जवळपास निम्याहून अधिक सांगली शहर हे जलमय झाले. सगळीकडे अडकलेल्या नागरिकांना आणि मदतीसाठी युद्धपातळीवर मिल्ट्री ,एनडीआरफ, जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत होते.

१० ऑगस्ट...आणि पुराच्या विळख्यातून मुक्तता होण्यास सुरुवात ..

या दिवसापासून कृष्णेची पण पातळी ओसरण्यास सुरवात झाली. ५७.५ असणारी पाणी पातळी सकाळी ५६.५ झाली. इंचा -इंचाने पाणी ओसरू लागले.सायंकाळी ५५.९ फूट इतकी पाणी पातळी झाली. दिवसभरात साधारणता दीड फूट पाणी पातळी उतरली आणि सांगलीकरांना दिलासा मिळाला..

११ ऑगस्ट - या दिवशी कृष्णेची पाण्याची पातळी सायंकाळी ५३.५ फुटांवर आली.

१२ ऑगस्ट- या दिवशी कृष्णेची पाण्याची पातळी चार फुटांनी उतरून सायंकाळी ४९.११ फुटांवर आली. १

१४ ऑगस्ट - कृष्णामाई पात्रात परतली आणि सांगलीने घेतला मोकळा श्वास..

या दिवशी कृष्णेची पाण्याची पातळी सायंकाळी ४४.९ फुटांवर आली. रौद्र रूप धारण केलेली, कृष्णामाई पुन्हा आपल्या पात्रात परतली. दहा दिवसापासून कृष्णेच्या पुराच्या विळख्यात असणारया कृष्णाकाठ आणि सांगली शहराने अखेर मोकळा श्वास घेतला..

एकूणच महाप्रलयंकारी महापुराने सांगली जिल्ह्यतील वारणा आणि कृष्णा काठ हा उद्धवस्त केला. यामध्ये सर्व सामान्य माणसापासून व्यापारी, शेतकरी अशा सर्वांना मोठा फटका बसला. पुरात झालेले नुकसान आजही भरून निघालेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details