सांगली - घरफोडी करून पळून जाणाऱ्या दोन दरोडेखोरांना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. विशेष म्हणजे हे दोघेही दरोडेखोर नदी ओलांडून जात होते, तेव्हा ग्रामस्थांनी पोहत जाऊन त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सांगली शहरातील हनुमाननगर परिसरात ही घटना घडली, तर घरफोडी केल्यानंतर अंकली येथे त्या दोघांना पकडण्यात आले.
हेही वाचा...VIDEO : कोरोनाचा धसका, कोल्हापूरात बाजूने जाताना शिंकल्यामुळे एकाला बेदम मारहाण
सांगलीतील हनुमाननगरमध्ये घरफोडी करून पळून निघालेल्या दोन्ही दरोडेखोरांना ग्रामस्थांनी थेट नदीतून पोहत जात पकडले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दरोडेखोरांना बेदम चोप सुद्धा दिला. हे दोन्ही दरोडेखोर हनुमाननगर मधून इनामधामणी मार्गे पळत निघाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. हे दोन्ही दरोडेखोर अंकली येथील कृष्णा नदीजवळ पोहचले. पुढे कोणताच मार्ग नसल्याने त्या दोघांनी नदीत उडी टाकत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यानंतर ग्रामस्थांनी देखील नदीत उड्या घेतल्या आणि पाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघा दरोडेखोरांना पकडले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दोघांना बेदम चोप दिला. तसेच त्यांना झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांकडून काही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.