सांगली- केंद्र सरकारच्या इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, शिवाय बैलगाडीमध्ये दुचाकी आणि प्रतिकात्मक गॅस सिलेंडर ठेऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. या दरवाढीच्या विरोधात देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. सांगलीतही मोदी सरकारच्या दरवाढीचे पडसाद उमटले. सांगलीच्या मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने या दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. बैलगाडीमध्ये स्वार होत, मदनभाऊ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट बैलगाडी मोर्चा काढला.
बैलगाडीत दुचाकीआधीच कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर त्याचे मोठे परिणाम होत आहे. गगनाला भिडलेल्या या दरामुळे, सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी घेऊन, त्यामध्ये मोटरसायकल व प्रतिकात्मक गॅस सिलेंडर ठेवून मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष आनंदा लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.