सांगली -सांगलीच्या महापुरात वधूने बोटीतून गृहप्रवेश केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून वर-वधूला ट्रोलही करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना 'परिस्थितीशी सामना करणे आम्हाला भाग होते. पण हा व्हिडीओ व्हायरल होईल, असे वाटले नव्हते. पण आता आनंदाची भावना असल्याची प्रतिक्रिया नव दांपत्याने व्यक्त केली आहे.
पुरातल्या पाण्यातून निघाली वरात -
सांगलीला महापुराचा विळखा पडला. या महापुरात जवळपास अर्ध्याहून अधिक शहर बुडाले. तर शहरातील गावभाग या ठिकाणी राहणाऱ्या रोहित सूर्यवंशी याचा 26 जुलै रोजी महापुराच्या परिस्थितीत विवाह पार पडला. नियोजित वेळेनुसार आणि तारखेनुसार हा विवाह पार पडला. त्यानंतर रोहितने वधू सोनालीसह राहत्या घरात प्रवेश करण्याचे ठरवले. मात्र, आसपास पाणी साचले असल्याने घरापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना बोटीचा सहारा घ्यावा लागला.
व्हिडिओ तुफान व्हायरल -
वर-वधूंची वरात बोटीतून महापुराचे पाणी भेदत घरापर्यंत पोहोचली. जाताना वधु-वरांनी पुराच्या पाण्यात असलेल्या मारुती चौक येथील मंदिराचे दर्शनही घेतले. यासर्व घटनेचा व्हिडीओ रोहितच्या नातेवाईक व मित्रांनी काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी 'भावाचा नाद खुळा', 'भावाची वरात सांगलीच्या पुरात', अशा मीम्स् बनवल्या.
'वाटलं नव्हतं व्हिडीओ इतका व्हायरल होईल' -
या नव दाम्पत्यांनी समोर येऊन याबाबतचा प्रतिक्रिया दिली आहे. 26 जुलै रोजी माझा विवाह ठरला होता. तो नियोजित तारखेनुसार पार पडला. विवाह सोहळा झाल्यानंतर गृह प्रवेश हा आपल्याच घरात झाला पाहिजे, अशी माझी इच्छा होती. कारण की मी ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी पुराचे पाणी आले नव्हते. पण घरात फक्त बोटीतून जावे लागणार होते, त्यामुळे केवळ जी परिस्थिती होती, त्याला आम्ही सामोरे गेलो. त्यावेळी असे वाटले नव्हते की, हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होईल. पण आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, छान वाटत आहे, अशी भावना रोहित यांनी व्यक्त केली आहे.
'इतकी प्रसिद्ध मिळते आहे, छान वाटतंय' -
26 जुलै रोजी विवाह झाल्यानंतर गृहप्रवेश करण्याचे ठरले. सुरुवातीला बोटीतून जाताना भीती वाटली. मात्र, रोहितसोबत असल्याने काही वाटले नाही. घरात प्रवेश केल्याचा आनंद झाला. दरम्यान, आमचा बोटीतील प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावेळी काही वाटले नाही, पण पण छान वाटते आहे, अशी प्रतिक्रिया वधू सोनाली यांनी दिली.
रात्रीतून पुरातील जोडी फेमस -
महापुराच्या परिस्थितीत पार पडलेला हा लग्न सोहळा, त्यानंतरचा गृह प्रवेश, तोही थेट महापुरात बोटीतून झाल्याने एका रात्रीतून नवदांम्पत्य प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. काहींना ट्रोल केले असले, तरी या जोडप्याने त्याकडे दुर्लक्ष करत येत असलेले अनुभव छान आसल्याची भावना व्यक्त केली आहे.
हेही वाचा - महाबळेश्वरने अनुभवला सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस