महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रह्मनाळ गावाला सुपूर्द केलेली बोट प्रशासनाने परत मागवली, राजकारण करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

बोटी मिळताच गावातील लोकांनी मोठ्या जल्लोषात या नव्या बोटीचे पूजन करून आपत्तीच्या काळात मदतीसाठी सज्ज राहणाऱ्या बोटीचे स्वागत केले. त्यामुळे ब्रम्हनाळमधल्या ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, प्रशासनाने काही वेळातच ग्रामस्थांकडे बोट परत देण्याची मागणी केली.

brhamnal village and zp administration boat dispute at sangli
brhamnal village and zp administration boat dispute at sangli

By

Published : Aug 8, 2020, 11:41 AM IST

सांगली -संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या ब्रह्मनाळ या ठिकाणी बोटीवरून आता वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाने दिलेली नवी बोट अवघ्या काही वेळात परत मागितल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत बोट गावात रोखून ठेवली आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांनी मंत्र्यांच्या हस्ते उदघाटनासाठी प्रशासनाकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप करत बोटीला हात लावून दाखवा, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रशासनाच्या कारभारामुळे संतप्त पडसाद उमटत आहेत.

8 ऑगस्ट 2019 ला सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामध्ये पलूस तालुक्यातल्या ब्रह्मनाळ याठिकाणी बोट दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये 17 जणांना जलसमाधी मिळाली होती. केवळ प्रशासनाकडून वेळेत बोट उपलब्ध होऊ न शकल्याने ही बोट दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ब्रह्मनाळ या गावाला बोट देण्याचा निर्णय घेतला होता. त्या घटनेला शनिवारी आठ ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, जिल्हा परिषद प्रशासनाने १६ नव्या बोटी खरेदी केल्या आहेत. त्यापैकी एक नवी यांत्रिक बोट शुक्रवारी दुपारी ब्रह्मनाळ ग्रामस्थांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. बोटी मिळताच गावातील लोकांनी मोठ्या जल्लोषात या नव्या बोटीचे पूजन करून आपत्तीच्या काळात मदतीसाठी सज्ज राहणाऱ्या बोटीचे स्वागत केले. त्यामुळे ब्रम्हनाळमधल्या ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, प्रशासनाने काही वेळातच ग्रामस्थांकडे बोट परत देण्याची मागणी केली. बोटीची चाचणी करण्याचे कारण देत बोट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याबाबतच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र संताप निर्माण झाला आहे. बोटीची चाचणी केली नसताना बोट दिलीच का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करत प्रशासनाने दिलेली नवी बोट थेट ग्रामपंचायतीसमोर नेऊन ठेवत, बोट देण्यास नकार दिला आहे.


दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. गतवर्षी पूरस्थितीत नादुरूस्त बोट असल्यामुळे ब्रम्हनाळ गावात तब्बल १७ जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे याची दखल घेऊन गतवर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही तत्काळ जिल्ह्यातील पूरपट्ट्यातील सर्व गावांमध्ये बोटी देण्याचे नियोजन केले. याची निविदा प्रक्रीया राबवून यंदा पावसाळ्यापूर्वी या बोटी देण्याचे नियोजन केले. सुमारे सोळा बोटींची तयारी झालेली आहे. आता सर्व प्रक्रीया पूर्ण करण्यात आल्या आहेत. बोटी ब्रम्हनाळ आणि भिलवडी गावात दाखल झाल्या. त्यासाठी मुंबईहून मरिन अधिकारी आले होते. गावातील लोकांनी हालगी वाजवत, महिलांनी बोटीची पुजा केली. मात्र, केवळ एका मंत्र्यांना उदघाटन करून श्रेय घेता यावे, यासाठी प्रशासनाकडून काही वेळेतच या बोटी परत मागविण्याचे राजकारण केले आहे.

सध्या मोठा पाऊस सुरू आहे. धरणांची आणि नद्यांची पाणी पातळी वाढते आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पुन्हा पुराची धास्ती आहे. अशात जर कोणाला असे किळसवाणे राजकारण सूचत असेल, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या बोटी लोकांच्या आहेत, त्यांच्या सेवेसाठी आहेत. जर का? श्रेयासाठी कोणी याला हात लावणार असेल, तर याद राखा, असा इशाराही संग्राम देशमुख यांनी यावेळी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. बोटींच्याबाबतीत प्रशासनाकडून जर राजकारण होत असेल तर ग्रामस्थ आपल्या हेक्याने जातील, असा इशारा देत जिल्ह्याच्या नेत्यांनी आणि प्रशासनाने ब्रह्मनाळ वासीयांच्या बाबतीत राजकारण करू नये, अशी विनंतीवजा इशारा संदीप राजोबा यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details