महाराष्ट्र

maharashtra

सांगलीत रंगणार तिरंगी लढत; गोपीचंद पडळकरांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी

By

Published : Apr 3, 2019, 8:59 AM IST

Updated : Apr 3, 2019, 11:46 AM IST

बंडखोर नेते गोपीचंद पडळकरांना अखेर तिकीट मिळाले... वंचित बहुजन आघाडीकडून उतरणार सांगली लोकसभेच्या रिगंणात... शक्ती प्रदर्शन करून आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

गोपीचंद पडळकर


सांगली- भाजपचे बंडखोर उमेदवार गोपीचंद पडळकर यांना अखेर वंचित बहुजन आघाडी मधून उमेदवारी मिळाली आहे. मंगळवारी पडळकर यांनी सांगलीमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. यावेळी पडळकर यांनी मराठा समाजाने बहुजन वंचित आघाडीत यावे, असे आवाहन करत ही निवडणूक भाजप विरोधात असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पडळकर आज बहुजन वंचित आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी दाखल करणार आहेत. यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे.

गोपीचंद पडळकर

अनेक राजकीय घडामोडीनंतर सांगलीच्या लोकसभेत मैदानात तगडे उमेदवार उतरले आहेत. भाजपकडून संजयकाका पाटील, महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील आणि आता वंचित बहुजन आघाडी करून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. त्यामुळे सांगलीच्या लोकसभा मैदानात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पडळकर माघार घेणार की अपक्ष म्हणून लढणार,तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांना उमेदवारी मिळणार की वंचित बहुजन आघाडीकडून लढणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असताना, ऐनवेळी पडळकर यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला. यामुळे लोकसभा मैदानात पडळकरांची एंट्री होणार की नाही. याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असे स्पष्ट करत भाजपच्या संजयकाका पाटील यांच्याविरोधात आपली निवडणूक असल्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून ही आपल्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगलीमध्ये स्पष्ट केले होते.

गोपीचंद पडळकर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संभाजी भिडे यांच्यासोबतचे व्हायरल झालेल्या फोटोंमुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी बाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मंगळवारी अखेर त्यांच्या उमेदवारीवर वंचित बहुजन आघाडीकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत गोपीचंद पडळकर यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जयसिंग शेंडगे, प्रकाश शेंडगे आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश करत पडळकर यांनी भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपली उमेदवारी रद्द व्हावी यासाठी भाजपच्या संजय पाटलांनी अनेक षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला.

..तर पळता भूई थोडी होईल-

माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामधील आणि शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर वायरल करण्यात आले आहेत आणि ते फोटो माझेच आहेत, ते मला मान्य आहे. मात्र, ते केवळ माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी वायरल करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण पडकरांनी यावेळी दिले. या प्रकारामागे कोण आहेत माहिती नाही. पण मी तुमच्या मागे लागलो तर पळता भुई थोडी होईल, असा इशाराही यावेळी पडळकर यांनी दिला आहे. तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून आता आपण काँग्रेसच्या विशाल पाटलांनी दत्त इंडिया कारखान्यातून मिळवलेले पैसे आणि संजयकाका पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून मिळवलेले पैसे मोकळे करण्यासाठी मैदानात असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्यांदा बदलला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार-

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पहिल्यांदा जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सांगली लोकसभेचे बदलते राजकारण यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभेचा उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बहुजन आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्काहील मोर्तब झाला होता.


त्यामुळे सांगली लोकसभेसाठी चौरंगी लढत होणार,असे चित्र निर्माण झाले असताना, स्वाभिमानीकडून ऐनवेळी पडळकर यांच्या ऐवजी विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांच्या ऐवजी वंचित बहुजन आघाडीकडून पडळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व राजकीय घडामोडी पाहता सांगलीत आता काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

Last Updated : Apr 3, 2019, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details