सांगली- सांगली जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दणका बसला आहे. मंत्री पाटील यांचे मेहुणे असणाऱ्या मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. भाजप गटाने याठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे.
मत्र्यांची सासुरवाडीत लक्षवेधी लढत
सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात सगळ्यात लक्षवेधी निवडणूक ठरली होती, ती मिरज तालुक्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीची. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सासुरवाडी आहे. त्या ठिकाणी त्यांचे मेहुणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर गटाविरुद्ध राष्ट्रवादीचे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी मंत्री जयंत पाटील यांची मेहुणी असणाऱ्या मनोरमादेवी शिंदे या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. या निवडणुकीमध्ये पुन्हा मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये सरपंच मनोरमादेवी शिंदे यांची मुलगी, दिर व अन्य कुटुंबातील सदस्य मैदानात होते. राष्ट्रवादी गटाच्या पॅनलच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा पार पडली.