जत(सांगली)- उद्धव ठाकरे यांचे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच अतिवृष्टीने फटका बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने त्वरीत लक्ष घालावे आणि त्यांना तातडीची मदत द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांसाठी भाजपा मोठा संघर्ष उभा करेल, असा इशाराही दरेकर यांनी राज्य सरकारला दिला.
तर... भाजपा मोठा संघर्ष उभा करेल; जतच्या पाहणी दौऱ्यात दरेकरांचा इशारा - सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी
राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही, यावरून भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
जत तालुका कृषी अधिकारी हणमंतराय मेढीदार यांच्याकडून संपूर्ण जत तालुक्यातील १२० गावाच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातील दौरा संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री यांना भेटून दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी,यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जत तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे निवेदन माजी सभापती तम्मगोंडा रवि पाटील यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले. रवि पाटील म्हणाले,जत हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका असून जिद्द, चिकाटीच्या जोरावर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली शेती फुलवली आहे. उन्हाळ्यात; प्रसंगी टँकरने पाणी आणून आपली शेती जगवली. मात्र परतीच्या पावसाने या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.