महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सगळी जबाबदारी केंद्राची; मग तुम्ही काय करणार? - चंद्रकांत पाटील - अतिवृष्टीच्या नुकसानीस भरपाई द्या

राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावीही मागणी करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. प्रत्येक आपत्तीकाळात राज्य सरकार केंद्रसरकारकडेच बोट दाखवत असेल तर राज्य सरकार काय करणार असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

chandrakant-patil-taunts-thackeray
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By

Published : Oct 18, 2020, 5:09 PM IST

सांगली- राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे असेल तर, मग तुम्ही काय करणार? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करत पाटील यांनी तातडीने राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांकडून नुकसान भरपाईच्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पाटील म्हणाले, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू होती. मात्र प्रभारी मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीतून दहा हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने साडे सहा हजार कोटींची मदत दिली. तसेच नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आधी निवेदन तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर किती नुकसान झाले हे पाहून मदत जाहीर केली पाहिजे.

मदत करण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागितली पाहिजे, अतिवृष्टी झाली, महापूर आला, निसर्गचक्री वादळ आले की फक्त केंद्राकडे बोट दाखवायचे, स्वतः मात्र काही मदत करायची नाही. मग तुम्ही करणार काय? असा खोचक सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना गेल्यावर्षी राष्ट्रपती राजवट लागू असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीची मागणी केली होती, त्यामुळे आता मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांनी ती मदत जाहीर करावी, कशाला पंचनामे करताय, असा सवालही पाटील यांनी केला आहे.

आम्ही वारंवार टीका केल्याने मुख्यमंत्री आता बाहेर पडत आहेत, याबद्दल त्याचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोलाही लगावला आहे. तसेच आपत्ती परिस्थितीत फिल्डवर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

कोरोनात सर्व मदत केंद्राने केली-

राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व मदत केंद्र सरकारने केली आहे. गोरगरिबांना धान्यापासून ,सिलेंडर, पैसे सर्व काही मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतही केंद्र सरकारने केली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अतिवृष्टी बाबत मदत मागण्यासाठी जाण्याचे नियोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जरूर पंतप्रधानाकडे जातील, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details