सांगली - धनगर आरक्षण मागणीसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने समस्त धनगर समाजाने धनगरी वेशभूषा परिधान करून धनगर आरक्षणचा जागर करत महाविकास आघाडीला ताकद दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी धनगरी वेशभूषा परिधान करून केले आहे.
धनगर आरक्षणासाठी आंदोलनाची हाक
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडीविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. मात्र असे असताना धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारला धनगर समाजाची ताकद आणि विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन जाहीर केले आहे.
'पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी व्हा'
ते म्हणाले, की जयंतीच्या दिवशी आपण चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून फेसबुकच्या माध्यमातून "करूया धनगर आरक्षणाचा जागर" हा मुद्दा घेऊन समस्त धनगर समाजाशी संवाद साधणार आहोत. समस्त धनगर समाजाने यावेळी आपल्या धनगरी पारंपरिक वेशभूषेत फोटो काढून कमेंटमध्ये पोस्ट करावी, ज्यामुळे सरकारला ताकद कळेल.