सांगली - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या नुकसान पाहणी दौऱ्यावरून भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या वयातही नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवारांना शेताच्या बांधावर जावे लागते, हे राज्य सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांच्या दौऱ्यावरून भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. आज अतिवृष्टीच्या संकटानंतर शरद पवार यांना शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते हे राज्य शासनाचे अपयश आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.