सांगली - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणाऱ्या राज्य सरकारला आक्रोश करणारे एसटी कर्मचारी आपले कुटुंब वाटत नाही का ?असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. दिवाळीच्या तोंडावर पगारासाठी आंदोलन करायला लावणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? अशी टीकाही आमदार पडळकर यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष -
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकलेले आहे. सध्या दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन, सणासाठी उचल यासह विविध मागण्यांसाठी आज राज्यभर आंदोलन छेडले. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावरून भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. ज्यामध्ये 80 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. त्यापैकी केवळ 6 कर्मचाऱ्यांना मदत मिळाली. इतरांना अद्याप मदत मिळालेली नाही. ऑगस्टपासून एसटी कर्मचाऱयांना पगार दिला नाही. याउलट मुंबईत बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. सरकारचा हा कुठला न्याय आहे, असे पडळकर म्हणाले.
सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब -
कायद्यानुसार महागाई भत्ता, सण उचल देने बंधनकारक आहे. मात्र, याकडे सरकारने दुर्लक्ष केले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी आपल्या कुटुंबासहित आक्रोश करावा लागला. ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.