सांगली -'खासदार संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा आहे. हा खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना', अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सामनातील संपादकीय लेख आणि ओबीसी आरक्षणावरून संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या विधानावरून पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर घणघोर टीका केली आहे. पडळकर आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.
'राऊतासारख्या भाटाची धनगर समाजाला अजिबात गरज नाही'
'संजय राऊतासारख्या भाटाची धनगर समाजाला अजिबात गरज नाही. मुळात जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 हजार कोटी रुपयांची तरतुद केली होती. मात्र, राऊताच्या मालकाने त्यातील एकही रुपया दिला नाही. त्याबद्दल आधी राऊताने बोलले पाहिजे. ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी 23 अध्यादेश काढले, हे राऊताला माहिती नाही. 23 अध्यादेशांपैकी एकाही जीआरची अंमलबजावणी आघाडी सरकारने केली नाही. त्याचा आपण जाहीर निषेध करतो', असे पडळकरांनी म्हटले आहे.