महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोनाची राजधानी तर ठाकरे सरकार रक्त पिपासु-भ्रष्टाचारी; आशिष शेलार यांची जहरी टीका - महाविकास आघाडी सरकार

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवली आहे. तर राज्यातील ठाकरे सरकार हे रक्त पिपासु भ्रष्टाचारी वृत्तीचे असल्याची जहरी टीका भाजपाचे प्रवक्ते व आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

bjp mla ashish shelar criticized maha vikas aghadi gov in sangli for covid measures
महाराष्ट्र कोरोनाची राजधानी तर ठाकरे सरकार रक्त पिपासु-भ्रष्टाचारी; आशिष शेलार यांची जहरी टीका

By

Published : Jul 13, 2021, 12:53 AM IST

सांगली - महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवली आहे. तर राज्यातील ठाकरे सरकार हे रक्त पिपासु भ्रष्टाचारी वृत्तीचे असल्याची जहरी टीका भाजपाचे प्रवक्ते व आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षण न्यायालयात रद्द होण्यात महाविकास आघाडी सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोपही आमदार शेलार यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगलीमधील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा आमदार आशिष शेलार
आघाडी सरकारवर शेलारांचा हल्लाबोल
भाजपाचे प्रवक्ते तथा आमदार आशिष शेलार सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सांगलीमध्ये सोमवारी शेलार यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती, मराठा आरक्षण व विविध विषयांवरून महाविकास आघाडी सरकारवर आमदार शेलार यांनी जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्र कोरोनाची राजधानी
राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवरून बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले, 'आज महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्या ही अधिक आहे. मात्र प्रगत महाराष्ट्रातील आघाडी सरकारकडून कोरोना सुविधा देण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे सकारात्मक भूमिका पाहायला मिळाली नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र कोरोनाची राजधानी बनली आहे.'
ठाकरे सरकार रक्तपिपासू आणि भ्रष्टाचारी
शहरातला कोरोना आज ग्रामीण भागात पसरत आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याचे श्रेय ठाकरे सरकार घेतं. पण दिलेल्या लसी योग्य पद्धतीचे नियोजन होत नसल्याने लसीकरण केंद्र 2 दिवस बंद राहतात. मग त्याचा दोष मोदी सरकारला देण्यात येतो. ही आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आहे. आज मोदी सरकारकडून देशात सगळ्यांना मोफत लस देण्यात येत आहे, असे असताना केवळ राजकारण करण्यात येते. इतर विषयांवर बोलायचं झालं, तर या ठाकरे सरकारची वृत्ती ही रक्त पिपासू आणि भ्रष्टाचारी आहे, अशा शब्दात आमदार आशिष शेलार यांनी टीका केली.
आरक्षण रद्द हा तर कुटील डाव
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना आमदार शेलार म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकारकडून सगळ्यात आरक्षणाचा खेळखंडोबा करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून न्यायालयामध्ये योग्य भूमिका मांडण्यात आली नाही. जो अहवाल इंग्रजीमध्ये मांडायचा होता, तो सरकारकडून मांडण्यात आला नाही. राज्य सरकारच्या वकिलांनी देखील कोर्टामध्ये सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सरकारचा मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्याचा कुटिल डाव आहे, असा आरोपही आशिष शेलार यांनी केला.
इतर मुलांच्याकडेही लक्ष द्या
राज्य सरकारला कोणताही प्रश्न विचारल्यानंतर या सरकारचा एकच उत्तर असतं, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. पण प्रत्यक्षात तसे नाही, खरं तर या सरकारने माझा मुलगा, माझी मुलगी याच्या पलीकडे जाऊन इतर मुला-मुलींच्याकडे पाहिले पाहिजे, असा टोला लगावत या सरकारने बोट चेपी धोरण सोडले नाही तर भाजपा अजून तीव्र भूमिका घेतल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी आमदार आशिष शेलार यांनी दिला.
87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करा
सध्या सांगली जिल्ह्यात गाजत असलेल्या मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटल मधील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी बोलताना शेलार म्हणाले, हे खूप गंभीर प्रकरण आहे. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाला परवानगी कशी मिळाली याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच जर कोणी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजपा गप्पा बसणार नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही आपण करणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details