सांगली- एरव्ही कार्यकर्त्यांना मत्र्यांची वाट बघावी लागते. मात्र, आज सांगलीमध्ये चक्क भाजपचे महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरच कार्यकर्त्यांची वाट बघण्याची वेळ आली. बुथ समिती मेळाव्याला भाजप कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रम उरकून घेतला. तर विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पूलाच्या उद्घाटन कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
हेही वाचा -युतीत 50-50 फॉर्म्युला ठरला नाही; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला
सांगलीमध्ये आज (रविवारी) विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पूलाचे भाजपने थाटात उद्घाटन केले. या निमित्ताने भाजप पक्षाचा बुथ कमिटी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा पार पडला. मात्र, कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ आणि उद्घाटन सोहळ्यावर शिवसेनेने केलेली टीका, यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची सांगलीतील ताकद कमी झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगलीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विश्रामबागच्या वारणाली गेट येथे रेल्वे उड्डाण पूलाची मागणी होती. अखेर या ठिकाणी पूल बांधण्यात आला. तर या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकत शिवसेनेने पूल बांधण्याचे श्रेय एकट्या भाजपने घेऊ नये, असा इशारा दिला आहे.