सांगली - राज्यात महिला अत्याचाराचा मळे फुलवण्याचे काम आघाडी सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आपण कोणत्या आमदाराला खंडणी मागितली, त्याला समोर आणावे. माझे चप्पल आणि त्यांचे थोबाड असेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना दिला. त्या सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अत्याचाराचा मळा फुलवणेचे काम -
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. वाघ म्हणाल्या, महिला अत्याचाराचा मळा फुलवणेचे काम या सरकारकडून राज्यात केले जात आहे. राज्यात सरकारकडून बलात्काऱ्यांना आश्रय, अभय दिले जात आहे. शेख, लंके सरकारचे जावई आहेत का ? असा थेट सवालही चित्रा वाघ यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ महिला सुरक्षितेत सरकार अपयशी - तसेच महिला सुरक्षिततेबाबत हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून हे लोकधार्जिणे सरकार नाही, असेही चव्हाण म्हणालेत. महिला सुरक्षाचा शक्ती कायदा कधी येणार ? विकृताना रक्षण देण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही वाघ यांनी केला आहे. तसेच आज आरोग्य विभागातील भरतीत पुन्हा सावळा गोंधळ झाला आहे. परीक्षेस बसलेल्या हजारो तरुणांचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्यमंत्री यांनी तसदी घावी, असा टोलाही वाघ यांनी मुख्यमंत्री याना लगावला आहे.
माझं चप्पल आणि त्याचे थोबाड -
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केलेल्या खंडणी मागणीच्या आरोपावरून बोलताना विद्या चव्हाण यांच्यावर जोरदार टीका चित्रा वाघ यांनी केली. वाघ म्हणाल्या दुसऱ्या महिलेवर गंभीर आरोप करताना विद्या चव्हाण यांनी स्वतःची नाही, पण स्वतःच्या पिकलेल्या केसांची तरी लाज ठेवायला पाहिजे होती. मी कोणत्या आमदाराला खंडणी मागितली हे विद्या चव्हाण यांनी सिद्ध करावे, मी राजकारण सोडून देईन, हे आपण स्पष्ट केले आहे. पण विद्या चव्हाण यांच्या घरातील कौटुंबिक कलहाचा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा, असेही वाघ म्हणाल्या. तसेच विद्या चव्हाण यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे. तसेच ज्या आमदारकडे खंडणी मागितली आहे, त्याला समोर आणा. माझं चप्पल आणि त्याचे थोबाड असेल, असा इशाराही वाघ यांनी दिला आहे.
शरद पवार आणि अजित पवारांशी बोलणे -
त्या ज्या प्रकरणावरुन बोलत आहेत, ते प्रकरण आपण राष्ट्रवादीमध्ये असताना झाले आहे. याबाबत सर्व माहिती त्यावेळेस अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांना होती. त्यांच्या समोर सर्व गोष्टी घडल्या आहेत. तसेच याची कल्पनाही शरद पवारांना त्यावेळी होती. त्याच बरोबर विद्या चव्हाण यांच्याकडून होणाऱ्या खालच्या टिकेबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून आजच बातचीत केली असून अजित पवारांनी देखील हे खोटं आहे, त्यांनी हे बोलायल नाही पाहिजे होते, असं सांगितलं आहे. तसेच सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि शरद पवारांशी आपण याबाबत बोललो आहे. विद्याताई चव्हाण यांना बोलवून नेमकं काय घडलं होतं, हे सांगावे, अशी आपण विनंती केली असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले आहे.