सांगली - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. चार खासदार असणारे जर लोकनेते होत असतील, तर 303 खासदार असणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाला काय म्हणाले पाहिजे? असा सवाल करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.
शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते; आमदार गोपीचंद पडळकरांचा निशाणा - padalkar on ncp
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. चार खासदार निवडून आणणारे लोकनेते असतील तर नरेंद्र मोदींना काय म्हणायचे असा सवाल करत त्यांनी पवारांवर टीका केली. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ही शरद पवार हे छोटे नेते असल्याची टीका केली होती.
यापूर्वीही शरद पवारांवर केली होती जहरी टीका-
पडळकर यांनी यापूर्वीही शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले होते. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा शब्दात पडळकर यांनी पवार यांना लक्ष्य केले.