सांगली -मंत्री नवाब मलीक यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगारात विकली आहे, अशी टीका भाजपा प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच नवाब मलिकांना आर्यन-शाहरुख खानची चिंता आहे की, ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची, असा सवालही आमदार पडळकर यांनी केला आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.
हेही वाचा -'जनाब संजय राऊत एमआयएम की मोहब्बत कौन है ?' साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे - आमदार पडळकर
'नवाब मलिकांची मती ही भंगारात'
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपावरून पडळकर यांनी मंत्री मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, की त्या क्रूझमधून तेराशे लोक प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते. तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला, त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केली आहे. उर्वरित लोकांना एनसीबीने सोडले आहे. मुळात तुमचे सरकार वसुलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस. यांनाच कारवाई करावी लागते.
हेही वाचा -'पात्रतेपेक्षा जास्त मिळालेल्या पडळकरांचे संस्कार त्यांच्या भाषेवरून स्पष्ट होतात'
'लागेबांधे उघड होण्याची भीती'
ते पुढे म्हणाले, की तुमच्या स्वत:च्या जावयाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली तेव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होते? नवाब मलिकांना आर्यन, शाहरुख खानची चिंता आहे, की ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची? किंवा असे तर नाही ना की NCBने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघडे पडणार आहेत? या भीतीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना? अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे.