सांगली : 'माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचा ढोल वाजवून फुटला आणि संध्याकाळी सीबीआयने थप्पड मारल्यावर सगळे चिडीचुपपणे बिळात जाऊन लपले', अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. तसेच 'खोटं बोला पण रेटून बोला, असं त्यांचं काम आहे. सरकार गेल्यावर हे खोटं बोलायचे ट्रेनिंग क्लासेस सुरू करतील', असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
'नाथाभाऊ कर नाही, तर डर कशाला?'
ईडी चौकशीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपला छळ सुरू असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की 'जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होते. त्याला कर नाही तर डर कशाला? नाथाभाऊंनी काही केले नाही, तर छळण्याचा काय मुद्दा आहे? एका क्षणाला ईडी आणि सीबीआय थांबेल काही सापडत नाही म्हणून', असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
'सीबीआयची थप्पड आणि सगळे बिळात...'
'अनिल देशमुख यांना रविवारी सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा अहवाल आल्याचे सांगत ढोल वाजवून वाजूवन फुटला. संध्याकाळी एक थप्पड मारली सीबीआयने आणि सगळे चिडीचूप आप-आपल्या बिळात लपून बसले. कारण बहुधा सीबीआय अशा प्रकारच्या पुड्या सोडणाऱ्यावर कारवाई करू शकते, असं माझं कायदेशीर मत आहे. आता त्यांनी करावी की नाही? ही माहिती नाही. पण पुन्हा संजय राऊत म्हणतील चंद्रकांत दादांच्या सांगण्यावर सीबीआय चालते. कारण परवा आपण अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव आमच्या राज्य कार्यकारणीत मांडला आणि आता उद्या ईडीची चौकशी, आता उद्या माझ्या नावाने शिमगा करतील. त्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला, एकदम छान चाललंय. त्यामुळे यांनी ट्रेनिंग क्लास चालवले आहेत. सरकार जाईल. त्यानंतर हे खोटे बोलण्याचे ट्रेनिंग क्लाससे चालवतील',अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
'खुर्चीचा मोहामुळे पक्षाचे नुकसान दिसेना'
जयंत पाटील हे खुलेआमपणे शिवसेना आमदारांना पक्षात येण्याची ऑफर देत आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधतला. 'मी काही बोललो तर उद्या सामनातून माझ्यावर अग्रलेख येईल. त्याच पुस्तक तयार होईल. पण याबाबत बोलायचे झाले तर, हा उध्दव ठाकरे यांनी विचार करायचा आहे. आपण एका मुलखातीदरम्यान सांगितले, की 2019 मध्ये अतिशय नियोजन रित्या शिवसेना आणि भाजपामध्ये अंतर निर्माण केले गेले. नारायण राणेंच्या यात्रेच्या निमित्ताने ते अंतर आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. हे खुर्चीचा मोह असणाऱ्या उध्दव ठाकरे यांना कळत नाही. त्यामुळे खुर्चीवर प्रेम असणाऱ्या उध्दव ठाकरे यांना पक्षाचे नुकसान कळत नाही', असेही पाटील म्हणाले.
केवळ संजय राऊत बोलताना दिसतात...
'खरंतर संजय राऊत यांच्याशिवाय कोणीही बोलताना दिसते का? दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, रवी वायकर, अनिल देसाई कुठे गेले हे? एकटे संजय राऊत फक्त बोलतात. कारण ते खरे बोलतायत. इतर खरं बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले जात नसेल. नाही तर ते नाराज असतील. पक्षाचे नुकसान होत आहे. खेडला शिवसेनेची अख्खी पंचायत समिती पळवून नेली. पण काही करू शकले नाहीत. शेवटी संजय राऊत आले आपल्या स्टाईलने काही होवू देणार नाही म्हणाले. मात्र शेवटी राष्ट्रवादीचा सभापती झाला. पण मला संजय राऊत यांच्या स्टाईलचे कौतुक वाटते',अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
अलमट्टीची उंची महाराष्ट्रासाठी घातक...
'कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची पुन्हा वाढवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने ते घातक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करून ती उंची वाढवू न देण्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आधीच दाबून कर्नाटक सरकारकडून उंची वाढवण्यात आली आहे. त्यामध्ये आता आणखी वाढ करण्यात येणार आहे. करारामध्येही धरणाची उंची वाढवण्याला परवानगी नाही. या उंचीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना मोठा धोका होणार आहे', असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले.
हेही वाचा -ठाण्यात फेरीवाल्याचा सहाय्यक आयुक्तावर हल्ला, बोटे छाटली