सांगली- राज्य सरकारच्या विरोधात भाजपाच्यावतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या स्थगितीच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या स्थगिती आदेशाची होळी करत भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारच्या वतीने कृषी कायदा करण्यात आला आहे. मात्र, या कृषी कायद्याला विरोध दर्शवत राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारची ही भूमिका शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करत भाजपाच्यावतीने करण्यात आला. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भाजपाने राज्य सरकारच्या या आदेशाच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या स्थगिती आदेशाची होळी केली.
कृषी कायद्याला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून सांगलीत आंदोलन - सांगली भाजप बातमी
केंद्राच्या कृषी कायद्याला अनेक राज्यांतून विरोध होत आहे. या कायद्याला महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिली आहे. याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या स्थगिती आदेशाची होळी केली.
भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकरी हिताचे कायदे मंजूर केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना या कायद्यामुळे मोठा फायदा होणार आहे, असे असताना राज्य सरकार मात्र याला विरोध करत आहे, कारण बाजार समित्या या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची केंद्रे असून या राजकारणाची अड्डे भाजपा सरकारने उद्ध्वस्त केली आहेत,त्यामुळे या सरकारने शेतकरी हिताचे कायद्याला स्थगिती देण्याचे काम करत शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप या वेळी भाजपच्या वतीने करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष मनोज दीपक शिंदे-म्हैसाळकर व महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -सांगलीत उपयोगकर्ता कर हटवण्याच्या मागणीसाठी पालिकेच्या दारात बँडबाजा आंदोलन