सांगली -महापालिकेच्या कारभाराविरोधात दलित महासंघाच्या वतीने "भीक मांगो" आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या प्रसूतिगृहात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
रुग्णवाहिकेच्या मागणीसाठी महापालिकेविरोधात दलित महासंघाचे "भीक मांगो आंदोलन" - दलित महासंघ
सांगलीतील 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रसुती गृहात' गरोदर महिलेला रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ होऊ न शकल्याने महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. ही घटना रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने घडली त्यामूळे पालिका प्रशासनाच्या प्रसूतिगृहात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सांगलीतील 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रसुती गृहा'त नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी रुग्णवाहिका गरोदर महिलेला वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने हा प्रकार घडला. त्यानंतर महापालिकेचे उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपली स्वतःची शासकीय गाडी रुग्णवाहिका म्हणून देऊ केली आहे. मात्र अद्याप या रुग्णालयात पालिका प्रशासनाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. तर जी रुग्णवाहिका आहे, ती अद्याप दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ शनिवारी दलित महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
पालिका प्रशासनाकडे पैसे उपलब्ध नसल्याने नवी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसल्याचा आरोप करत, दलित महासंघाने पालिकेच्या या कारभाराचा निषेध म्हणून "भीक मांगो" आंदोलन केले आहे. जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या शनिवार बाजार मध्ये 'पालिकेला भीक लागली आहे, नवी रुग्णवाहिका खरेदीसाठी पैसे लागणार' असल्याचे आवाहन करत पैसे गोळा करण्यात आले. तर यावेळी भीक मांगो मधून गोळा झालेला निधी पालिकेला दान करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने प्रसुतीगृहात रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी उत्तम मोहिते यांनी दिला.