सांगली - येथील एका सलून व्यवसायिकाने डॉक्टरांप्रमाणे चक्क 'पीपीई किट'चा वापर करत आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या, या काळजीची सध्या चांगलीच चर्चा सांगलीत रंगली आहे.
'पीपीई किट' घालून त्याने सुरू केला व्यवसाय सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्स व अन्य अटी घालून उपनगर आणि रहिवाशी क्षेत्रातील दुकानांना परवानगी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाली असली तरी, कोरोनाचा धोका काही कमी झाला नाही. मात्र, जीव महत्त्वाचा असला तरी पोटाचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाच्या या महामारीत सामान्य व्यावसायिकाला आपला जीव धोक्यात घालून काम करण्याशिवाय पर्याय नाही. अशातच सांगलीच्या एका सलून व्यावसायिक अवलियाने आपला व्यवसाय सुरू करताना घेतलेली सुरक्षेची काळजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या सलून व्यावसायिकाने डॉक्टरांप्रमाणे 'पीपीई किट' परिधान करत थेट 'केश कर्तनालय' सुरू केले आहे.
सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील सावरकर कॉलनीमध्ये किरण जाधव यांचे 'रवीज सलून' हे केश कर्तनालय आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून या व्यवसायात आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून त्यांचाही व्यवसाय बंद होता. आता प्रशासनाने दुकान उघडण्यास मान्यता दिल्यानंतर जाधव यांनीही आपले दुकान चालू केले आहे. मात्र, अजून जिल्ह्यात आणि शहरात कोरोना रुग्ण आढळत असून धोका टळला नसल्याने, जाधव यांच्यापुढे आपली आणि आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची काळजी घेत सुरक्षा कशी घ्यायची, हा प्रश्न निर्माण झाला होता. कारण, कटिंग, दाढी करताना प्रत्येक व्यक्तीशी थेट संपर्क येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्स, या व्यवसायात पाळणे अशक्य होते. याचाच विचार करत असताना जाधव यांच्या समोर कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर, ज्या पद्धतीने उपचार करताना 'पीपीई किट' घालून सुरक्षित राहतात. त्याच प्रमाणे आपणही 'पीपीई किट' वापरू शकतो, हा विचार आला.
जाधव यांनी मग डॉक्टरांप्रमाणे पीपीई किटचा वापर करत, केस कटिंग, दाढी सुरू केले आहे. त्यामुळे जाधव यांनी स्वतःला पीपीई किटद्वारे पूर्ण सुरक्षित करून घेतले. शिवाय दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ते सॅनिटाईझरने हात धुवून प्रवेश देतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किरण जाधव यांनी अवलंबलेल्या या हटके स्टाईलची सध्या सांगलीत जोरदार चर्चा सुरू आहे.