सांगली- नजीकच्या पाच गावांसह शहराला महापुराच्या एका नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा फटका शहराला बसत होता. मात्र, आता सांगली नजीक निर्माण होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे बॅकवॉटरचा धोका निर्माण होणार आहे. जवळपास चार किलोमीटर पर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून 13 पर्यंत वाढविण्यात येत असल्याने सांगलीकरांसमोर एक नवा धोका निर्माण झाला आहे.
अलमट्टीचा प्रश्न सुटला, पण नवा निर्माण होतोय..
सांगली शहराला आणि त्याच्या नजीक असणाऱ्या गावांना कृष्णा व वारणा नदीला महापूर आल्यानंतर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा फटका आतापर्यंत बसल्याचा समोर आला आहे. 2005 आणि 2019 नंतर वारंवार महापुराचा धोका होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सोबत बैठक घेऊन अलमट्टी धरणातून पावसाळ्यात योग्य विसर्ग ठेवण्याबाबत विनंती केली आहे. त्याचे नियोजनही सुरू आहे. एका बाजूला राज्य सरकारकडून अलमट्टी धरणामुळे निर्माण होणाऱ्या बॅकवॉटरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला सांगली शहराला मात्र आता एका नव्या बॅक वॉटरचा समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
रस्त्याची उंची 7 ते 13 फुटांनी वाढली..!
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग मुळे हा धोका निर्माण होणार आहे. सांगली शहराच्या नजीक असणाऱ्या अंकली ते मिरज दरम्यान करण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी जवळपास 7 ते 13 पर्यंत पर्यंत वाढविण्यात आली आहे.
रस्त्यासाठी एक प्रकारे हा बांध घालण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला पुन्हा कृष्णा नदी पात्रात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाण्याचा प्रवाह थांबणार आहे, परिणामी हे पाणी इनाम धामणी सह सांगली शहराच्या विस्तारीत भागात पोहचणार आहे.