सांगली - जिल्ह्यातील कापूसखेड (ता. वाळवा) येथील व वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा तृप्ती देवानंद पाटील व त्यांचे पती देवानंद विश्वासराव पाटील यांच्या १० व्या पुण्यस्मरणाचा खर्च नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देवून करण्यात आला.
आई-वडिलांच्या पुण्यस्मरणाचा खर्च टाळून नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंची भेट - लॉकडाऊन
लॉकडाऊनच्या काळात सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी वाळवा तालुक्यातील पाटील परिवाराने आपल्या कुटूंबातील मृत सदस्याच्या पुण्यस्मरणाचा खर्च टाळून नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
देशभरात कोरोना संसर्ग वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे पुण्यस्मरणाचा विधी होणार नाही. सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असलेल्या पाटील परिवाराने मात्र पुण्यस्मरणानिमित्त होणारा खर्च नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबानेही साथ दिली. त्यांचे चिरंजीव जयदीप देवानंद पाटील यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार-पोतदार, कर्मचारी साहेबराव जाधव, किरण माने, सौरभ पाटील, स्वप्निल कुंभार, अक्षय मोकाशी, किरण दळवी, स्वप्निल पाटील यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.